ठाणे: गुरूवार १७सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.५२पर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असेपर्यंत लाडक्या ज्येष्ठा गौरींचे आगमन होत आहे. चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना शुक्रवार १८ सप्टेंबर रोजी त्यांचे पूजन करावयाचे आहे आणि चंद्र मूळ नक्षत्रात असताना शनिवार 1९ सप्टेंबर रोजी त्यांचे विसर्जन करावयाचे आहे, अशी माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.
ज्येष्ठा गौर म्हणजे हिमालयाची कन्या पार्वती आदिशक्ती आहे. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते, म्हणून ही निर्मिती आदिशक्तीची पूजा असते. निर्मितीशक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. काही प्रदेशात हिला महालक्ष्मी म्हणतात. परंपरेप्रमाणे काही प्रदेशात खड्याच्या गौरी पूजल्या जातात, काही ठिकाणी तेरडा वनस्पती गौरी म्हणून पूजतात. तर काही ठिकाणी मुखवटे धान्यांच्या राशीवर ठेवून पूजतात. १६ प्रकारचे नैवेद्य दाखविण्यात येतात. ही निसर्गशक्तीची पूजा असते. सासरी गेलेली कन्या लाडाची गौर म्हणून माहेरी येते. आई आपल्या कन्येचे लाड पुरवते, असेही सोमण यांनी सांगितले.